शिरूर संवाद ई-पेपर
क्राईम

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकाला अटक

Avinash Ghogare • 28 November 2026, 01:26 PM

शिरूर:


गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना जवळ बाळगणाऱ्या एका इसमाला शिरूर पोलिसांनी अटक केली. शिरूर शहरातील रेणुकामाता मंदिर परिसरात शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी. पथक) ही कारवाई केली. गणेश राम गव्हाणे (वय ३३, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.शिरूर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार बालाजी मोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेणुकामाता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेजवळ एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस विनापरवाना जवळ बाळगून आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची परवानगी घेऊन पोलीस पथक व पंचांसह संबंधित ठिकाणी धाव घेतली.यावेळी संशयितरीत्या आढळलेल्या इसमाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि त्यामध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस अंमलदार नितेश थोरात, बालाजी मोटे, संदीप खेडकर, राहुल वाघमोडे, विजय शिंदे, अर्जुन भालसिंग, अजय पाटील व अंबादास थोरे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग करीत आहेत.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)