शिरूर संवाद ई-पेपर
प्रशासन

शिरूरमध्ये गांजा तस्करीचा मोठा डाव उधळला..!

Avinash Ghogare • 26 November 2026, 06:48 PM

शिरूर : आलिशान मोटारीतून गांजाची तस्करी करण्याचा मोठा डाव पुणे शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने आज पहाटे उधळून लावला. थरारक पाठलागानंतर सुमारे १ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा २५० किलो गांजा घेऊन जाणारी आलिशान एसयूव्ही मोटार पोलिसांनी दोन गांजा तस्करांसह ताब्यात घेतली. या कारवाईत गांजासह सुमारे दहा लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या धाडसी कारवाईत समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोलवाडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) आणि अजय जगदिश मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून २५० किलो गांजा आणि सुमारे दहा लाख रुपये किमतीची एसयूव्ही मोटार (क्र. एमएच २७ डीएल ६९८४) जप्त करण्यात आली.

ओडिशातून पुण्याच्या दिशेने येत होता गांजाचा साठा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा राज्यातून गांजाचा मोठा साठा घेऊन एक मोटार पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही मोटार हैदराबादमार्गे यवतहून पुणे शहराकडे येत असल्याचे समजल्यानंतर पुणे शहर पोलीस उपायुक्त गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईचे नियोजन केले.

पोलिस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण व नितीनकुमार नाईक, पोलिस हवालदार योगेश कुंभार, शरद धांडे, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, योगेश मांढरे, सुहास धायगुडे, अख्तर शेख, जान्हवी सूर्यवंशी, सुकेशनी आमले, अजिंक्य जोजारे आणि दिनेश बाष्ठेवाड यांच्या पथकाने सोलापूर रस्त्यावर पाटस-दौंडदरम्यान नाकाबंदी केली.

नाकाबंदी चुकवून काष्टीमार्गे शिरूरकडे धाव

पोलिसांच्या नाकाबंदीची चाहूल लागताच गांजा तस्करांनी मोटार काष्टीमार्गे शिरूरच्या दिशेने वळविली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग सुरू केला. याबाबत पाटस आणि दौंड पोलिसांनाही माहिती देण्यात आली. मात्र, या नाकाबंदीतूनही सहीसलामत सुटून तस्करांनी निमोणे येथून मोटार शिरूरच्या दिशेने वळविली. त्यानंतर शिरूर पोलिसांना तातडीने सतर्क करण्यात आले.

सुंदर सृष्टी परिसरात पोलिसांची नाकाबंदी

शिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन केणेकर, उपनिरीक्षक गोविंद खटींग यांच्यासह अर्जुन भालसिंग, बालाजी मोटे, राजू मांगडे, दीपक फुंदे, रतन भोसले आणि सुशील सुरवसे यांनी शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या रस्त्यावरील सुंदर सृष्टीजवळ नाकाबंदी लावली.

संशयित मोटार येताना दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने भरधाव वेगाने मोटार पुढे नेली. काही अंतरावरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. यावेळी पोलिस कर्मचारी भालसिंग यांनी मोटारीच्या काचेवर हातातील काठी फेकून मारली. त्यामुळे चालकाचा मोटारीवरील ताबा सुटला. मात्र, तरीही चालकाने मोटार न थांबवता दिशाहीन अवस्थेत शिरूर शहराच्या दिशेने पुढे नेली.

स्टेट बँक कॉलनीत मोटार सोडून तस्करांचा पळ

यानंतर शिरूर पोलिसांसह मागून येणाऱ्या पुणे शहर पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग सुरूच ठेवला. गांजा तस्करांनी मोटार थेट शहरातील गजबजलेल्या स्टेट बँक कॉलनी परिसरात नेली. मात्र, पुढे रस्ता न सापडल्याने त्यांनी या परिसरातील दत्त मंदिराजवळ मोटार सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

दरम्यान, मोठा पोलिस फाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेत स्थानिक नगरसेवक संतोष थेऊरकर यांच्यासह परिसरातील तरुणांनीही सहभाग घेतला. अखेर परिसरातील एका पडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी लपून बसलेल्या समीर राऊत आणि अजय मोहिते या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पंचनामा करून दोघांना अटक

घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचा तपशील नोंदविण्यात आला. त्यानंतर दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली. पुणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आणि शिरूर पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या या कारवाईमुळे गांजा तस्करीचा मोठा डाव उधळला गेला आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)